BLOGGER TEMPLATES AND TWITTER BACKGROUNDS

Wednesday, June 22, 2011

# मला समजून घ्या रे !

या दुनियेत काही माणसं अशी असतात की, जी चेहे-यावर आपल्या मनातल्या भावना उतरवू शकत नाही.. त्यांनाही आनंद होतो, दु:ख होत, पण ते दाखवता येत नाही.. अश्या माणसांना आपण नेहेमी एक विशिष्ट शब्द वापरतो, 'मख्ख चेहे-याने बसलाय' जरा आनंद/दु:ख जाणवू देत की चेहे-यावर' मात्र अशा माणसांना आपण समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा...

चेहरा माझा सदैव कोरा, कुणालाही समजत नाही
मनामधल्या भावना या समोरच्याला उमजत नाही
कशी होईल यातून सुटका.? काहीतरी सांगा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

मनात खूप असते माझ्या, चेह-यावरून कळत नाही
माझ्या भावना मणाकडून चेह-याकडे वळत नाहीत
चेह-यावरून कळत नसेल तर आडाखे तरी बांधा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

चेहरा बोलका असतो खरा, मी मात्र अपवाद आहे
का माझ्या भावनांचा चेह-याबरोबर वाद आहे.?
माझाच चेहरा का असा.? त्याला काही शिकवा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

कधी माझ्या चेह-यावरची माशीसुद्धा हलत नाही
भावनांचे व्यक्त होणे बहुदा त्याला चालत नाही
काहीही असो, तुम्हीच त्याला हात धरून चालवा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

मीही खूप प्रयत्न केला चेह-याद्वारे बोलण्याचा
मनामधल्या भावनांना चेह-यावरती आणण्याचा
जमले नाही काहीच, आता तुम्हीच त्याला सावरा रे
माझे म्हणणे एवढेच आहे, मला समजून घ्या रे !..

0 comments: